नवी दिल्ली - तेलंगणात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. बीआरएस पक्षाला लागलेली गळती थांबत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत ६ आमदारांनी पक्षाला रामराम केला. गुरुवारी विधान परिषदेचे ६ आमदार बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झालेत आहे.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या आमदारांना पक्षाचं सदस्यत्व दिलं. या ६ आमदारांमध्ये विठ्ठल दांडे, भानु प्रसाद राव, एम.एस प्रभाकर, बोग्गरापु दयानंद, येग्गे मल्लेशम आणि बसवाराजू सरैया यांचा समावेश आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आगामी काळात आणखी काही आमदार सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
२ दिवसांपूर्वी बीआरएसला मोठा धक्का बसला होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार के केशव राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत केशव राव यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. तेलंगणात झालेल्या पराभवानंतर बीआरएस पक्षाचे आमदार सातत्याने पक्ष सोडत आहेत. त्याशिवाय हैदराबादच्या महापौर विजया लक्ष्मी आर गडवाल यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीत BRS ला फटका
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण १९९ जागांपैकी बीआरएसला फक्त ३९ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसनं ६४ जागा जिंकत राज्यात सत्ता मिळवली. सिंकदराबाद कॅन्टोन्मेंटच्या बीआरएसच्या आमदार जी लास्या नंदिता यांचं यावर्षीच्या सुरुवातीला रस्ते अपघातात निधन झाले. त्यानंतर या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. त्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या ६५ झाली.
विधान परिषदेचं संख्याबळ वाढलं
तेलंगणा वेबसाईटनुसार, विधान परिषदेत सध्या बीआरएसकडे २५ सदस्य आहेत तर काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. ४० सदस्यीय विधान परिषदेत ४ नामनिर्देशित सदस्य आहेत. ऑल इंडिया मजलिस इ इत्तेहादुल मुस्लिमीनचे २, भाजपा आणि पीआरटीयूचे १-१ आणि अपक्ष १ असे सदस्य आहेत. तर २ जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे गुरुवारी तेलंगणात परतताच याठिकाणी बीआरएसच्या ६ सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस आमदारांचं संख्याबळ १० इथपर्यंत वाढलं आहे.