हैदराबाद - पायाभूत सुविधा आणि गतीमान दळणवळणासाठी महामार्ग व रस्ते बांधणी मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातच, वाहनांचीही संख्या वाढली असून रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते. तेलंगणातील भारतीय राष्ट्र समितीच्या महिला आमदार लास्य नंदिता यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा (३७ वर्षे) मृत्यू झाल्याची माहिती आहे. तेलंगणात नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिकंदराबादच्या कैट मतदारसंघातून त्या आमदार बनल्या होत्या.
आमदार नंदिता ह्या त्यांच्या खासगी कारने संगारेड्डी येथून अमीनपूरला जात असताना सुल्तानपूर आऊटर रिंग रोडवर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या दुर्घटनेत आमदार लास्य नंदिता गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत कारचालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
बीआरएस प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला. युवक आमदार म्हणून आपल्या कामातून ओळख निर्माण केलेल्या लास्य नंदिता यांचे रस्ते अपघातात निधन झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, मी आणि बीआरएस पक्ष आमदार नंदिता यांच्या कुटुंबासोबत असल्याचंही के. राव यांनी म्हटलं आहे.