नवी दिल्ली - भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) दिल्लीतील कार्यालयाचे उद्घाटन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी बीआरएस पक्षाचे काही मंत्री व खासदार प्रामुख्याने उपस्थित होते. कोणताही बडेजाव न करता अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला.
दिल्लीतील वसंत विहार परिसरात १०० चौरस मीटर परिसरात उभारलेल्या कार्यालयाचे गुरुवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी फीत कापून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उद्घाटन केले. या चार मजली इमारतीमध्ये तेलंगणामधून दिल्लीत येणारे नेते व कार्यकर्त्यांना बैठकांसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले सभागृह आहे. तसेच बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालयेही आहेत. या इमारतीमध्ये सकाळी सुदर्शन होम व वास्तुपूजा करण्यात आली. तेलंगणाचे मंत्री प्रशांत रेड्डी व खासदार जे. संतोषकुमार यांनी पारंपरिक वेशात पूजा व होमहवन केले. मुख्यालयाबाहेर ‘केसीआर फॉर इंडिया’ व ‘किसान का बेटा केसीआर’ असा मजकूर लिहिलेले फलक लावण्यात आले होते.