हैदराबाद : तेलंगणात विधानसभा निवडणुकीपूर्वी तिकीट वाटपावरून काँग्रेसच्या राज्य शाखेत असंतोष उफाळला असून, असंतुष्ट नेते सत्ताधारी भारत राष्ट्र समितीत (बीआरएस) प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा हा पक्षही काँग्रेस असंतुष्टांना आपल्याकडे ओढण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याचे दिसते.
काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांत माजी मंत्री नगम जनार्दन रेड्डी यांचाही समावेश असून, त्यांनीही पक्ष सोडला आहे. दिवंगत काँग्रेस नेते पी. जनार्दन रेड्डी यांचे चिरंजीव माजी आमदार पी. विष्णू वर्धन रेड्डी यांना ज्युबली हिल्स मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. ज्युबली हिल्समधून काँग्रेसने माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना उमेदवारी दिली आहे.काँग्रेसने ११९ मतदारसंघांपैकी १०० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आणखी नाराज नेते बीआरएसमध्ये जाण्याची शक्यता आहे.
‘तेलंगणा विकास मॉडेल हा मुख्य मुद्दा असेल’
- तेलंगणा मॉडेलने समृद्धी आली असून, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा हाच मुख्य मुद्दा असेल व पक्ष तिसऱ्यांदा प्रचंड बहुमतांनी विजय मिळवेल, असे भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या भेटीदरम्यान सांगितले.
- ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात ‘सर्चिंग फॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथ : द तेलंगणा मॉडेल’ या विषयावर व्याख्यानासाठी विधानपरिषद सदस्य के. कविता यांना आमंत्रित करण्यात आले होते.