विभाष झा
दरभंगा/पाटणा : बिहारचे माजी राज्यमंत्री व विकासशील इन्सान पार्टीचे (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी यांचे वडील जीतन सहनी (वय ७० वर्षे) यांची दरभंगा जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे त्या राज्यात खळबळ माजली आहे. सदर प्रकरणात दोन संशयित आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात अतिरिक्त पोलिस महासंचालक जितेंद्रसिंह गंगवार यांनी सांगितले की, गुन्ह्याच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येणार आहे.
ताब्यात घेतलेल्यांची नावे जाहीर करण्यास गंगवार यांनी नकार दिला. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी स्थानिक पोलिसांना मदत करण्याकरिता विशेष तपास पथक दरभंगाला पाठविण्यात आले आहे. तसेच फोरेन्सिक पथक तसेच श्वानपथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.
कठोर कारवाई हवी : विरोधकांची मागणी
nबिहारमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचे जीतन सहनी यांच्या हत्या प्रकरणामुळे सिद्ध झाले आहे, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.
nविरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, जीतन सहनी यांची हत्या करणाऱ्या आरोपींवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी.
धारदार शस्त्राने वार
nजीतन सहनी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आल्यानंतर शेजारच्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. जीतन यांच्या शरीरावर भोसकल्याने खोल जखमा झाल्या आहेत.
nसोमवारी मध्यरात्री त्यांच्या छाती, पोटावर धारदार शस्त्राने वार झाले असावेत. त्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.