नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शिवसेनेचे नेते, मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही झालेल्या प्रकारावर टीका केली आहे. राहुल गांधी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनीसुद्धा या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. मोदींच्या मंत्र्यांसह विरोधकांकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 'जेएनयूतीलविद्यार्थी आणि प्राध्यापकांवर सुनियोजितपणे भ्याड हल्ला करण्यात आला. ही झुंडशाही, हिंसक कृती लोकशाहीविरोधी असून मी त्याचा तीव्र निषेध करतो' असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे.
'जामिया मिलीया किंवा जेएनयू सारख्या विद्यापीठांमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर हिंसक हल्ल्यांचे प्रकार गंभीर आणि चिंताजनक आहेत' असं म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा जेएनयूतील हिंसेचा निषेध केला. जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आयआयटी पवईतील विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब केला. तर, काहींनी मध्यरात्रीच गेट वे ऑफ इंडियावर कँडल मार्च काढण्याचे आवाहन केले. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'जेएनयूमधील हिंसाचाराने मला जबर धक्का बसला आहे. विद्यापीठातच विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर या देशाचे भले कसे होणार? पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करावी' असं म्हटलं आहे. हिंसाचार आणि अराजकता माजवणारी कृत्ये खपवून घेतली जाणार नसल्याचंही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. जेएनयूमधील हल्ल्यात 20 जण जखमी झाले. जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रतिसाद पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये उमटले असून, एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा संस्थेसमोर एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करत जेएनयूमधील विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. मार्क्सवादी नेते सिताराम येचुरी यांनी 'बुरखाधारी हल्लेखोर जेएनयूमध्ये घुसले आणि पोलीस बघत बसले. रा. स्व. संघ आणि भाजपाला भारताचे काय करायचे आहे हे सोबतच्या व्हिडिओवरून स्पष्ट होते. पण आम्ही त्यांना यात यशस्वी होऊ देणार नाही'
सार्थक (31), कमलेश (30), सुरी कृष्णन (23), गौरव (24), शांभवी (21), वेलेंटिना (26), शिवम चौरसिया (27), मनीष जंगीड (25), शेषमणी साहू (22), आयुशी घोष (23), अमित परमेश्वरम (37), निखिल मॅथ्यू (24), आयुष सिंह (19), ऐश्वर्य प्रताप (25), शौकत (28), उज्ज्वल (22), दीपशिखा (19), सीमित (21), कामरान (20) असे 19 विद्यार्थी जखमी झाले असून, सुचरिता सेन (45) या जखमी शिक्षिकेलाही रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. या हल्ल्याचा अनेकांनी निषेध नोंदवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
JNU Violence : 'जेएनयू' हल्ल्याचे देशभरात पडसाद; मुंबई, पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने
जेएनयूतील हिंसाचाराचा मुंबईतही नोंदवला निषेध
जेएनयू हाणामारीत एका शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी