बंगळुरू - भाजपाचे कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, नव्याने सरकार स्थापन करण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी एक मोठा बदल केला आहे. येडियुरप्पांनी आपल्या नावात बदल केला असून, येडियुरप्पांनी राज्यपालांना जे पत्र दिले आहे त्यामध्ये त्यांनी आपल्या नावातून D हे अक्षर हटवून I या अक्षराचा समावेश केला आहे. बी. एस. येडियुरप्पा हे आतापर्यंत आपले नाव इंग्रजीमध्ये B.S. Yeddyurappa असे लिहायचे. मात्र आज त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करताना दिलेल्या पत्रात आपले नाव B.S. Yediyurappa असे लिहिले आहे. दरम्यान, येडियुरप्पा यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यानं नावात बदल केल्याचे सांगण्यात येत आहे.खरंतर आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला येडियुरप्पा हे आपले नाव B.S. Yediyurappa असे लिहायचे. अगदी 1975 मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून ते 2007 मध्ये सात दिवसांचा मुख्यमंत्री बनण्यापर्यंत येडियुरप्पांनी हेच नाव कायम ठेवले होते. मात्र अंकज्योतिषांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कर्नाटचे मुख्यमंत्रिपद भूषवत असताना त्यांनी आपल्या नावात थोडासा बदल करून B.S. Yeddyurappa असे नाव धारण केले होते. मात्र आता ते पुन्हा एकदा आपल्या जुन्या नावावर परतले आहेत. दरम्यान, कर्नाटकमध्ये कुमारस्वामी पडल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आता आज संध्याकाळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
D आऊट अन् I इन; मुख्यमंत्री होण्याआधी येडियुरप्पांनी बदललं नावाचं स्पेलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 4:59 PM