बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिस येडियुरप्पा यांना POCSO प्रकरणात अटक करण्याच्या तयारीत आहेत. काल सीआयडीने येडियुरप्पा यांना लैंगिक छळ प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र ते सीआयडीसमोर हजर झाले नाहीत. अटकेच्या भीतीने येडियुरप्पा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची उद्या सुनावणी ठेवली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांना POCSO प्रकरणात अटक होणार की नाही, यावर राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी भाष्य केले आहे. गरज पडल्यास सीआयडी येडियुरप्पा यांना अटक करेल, असे जी परमेश्वर म्हणाले. तसेच, येडियुरप्पा यांना येऊन नोटीसला उत्तर द्यावे लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपपत्र १५ जूनपर्यंत दाखल करावे, असे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत येडियुरप्पा यांना नोटीस देण्यात आली आहे.
एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येडियुरप्पा यांच्यावर बंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिस ठाण्यात POCSO गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी येडियुरप्पा यांना नोटीस बजावली आहे. त्यांना तपासात सहभागी होण्यास सांगितले होते. सुनावणीला हजर राहण्यासाठी दिलेल्या नोटीसला उत्तर देताना त्यांनी सोमवार, १७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहणार असल्याचे सांगितले.
काय म्हणाले येडियुरप्पा?येडियुरप्पा म्हणाले की, २८ मार्च रोजी दिलेल्या नोटीसनुसार मी सुनावणीला हजर राहिलो आणि तपासात पूर्ण सहकार्य केले, मात्र पुन्हा १२ जून रोजी दिलेली नोटीस काल माझ्यापर्यंत पोहोचली. पक्षाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे यावेळी मी सुनावणीला उपस्थित राहू शकत नाही. १७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीला मी स्वतः उपस्थित राहीन. यापूर्वीही मी तपासात सहकार्य केले आहे. काही कारणांमुळे मी यावेळी तपासात सहभागी होऊ शकत नाही.