MBA चायवाला, B.Tech चायवाला नंतर आता BSC चायवाली लोकप्रिय झाली आहे. बीएससी पास असलेल्या मुलीने नोएडामध्ये स्वतःचा चहाचा स्टॉल उघडला आहे. यासाठी तिने आपली नोकरी सोडली. एवढेच नाही तर चहा विकण्याच्या तिच्या निर्णयामुळे तिच्या वडिलांनी तिच्याशी असलेलं नातं तोडलं. पण तिने हार मानली नाही. 'BSC चायवाली' पार्वतीची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...
नोएडातील सेक्टर 45 मध्ये राहणाऱ्या पार्वतीने चेतराम शर्मा कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून बीएससी मॅथेमॅटिक्स केले आहे. ती मूळची बिहारच्या मधुबनी रहिवासीआहे. तिचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात आणि भावाची कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. दुसरीकडे, पार्वतीने तिची 10 हजार पगार असलेली नोकरी सोडून सेक्टर 16 मेट्रो स्टेशनजवळ चहाचं छोटसं दुकान सुरू केलं आहे.
वडिलांनी दिली नाही साथ
पार्वतीला स्वतःला सक्षम बनवायचे होते. त्यासाठी चहाचे दुकान उघडून कामाला सुरुवात करणे तिला योग्य वाटले. अर्थात पार्वतीच्या वडिलांनी तिला यात साथ दिली नाही, पण भावाची साथही तिला पुरेशी होती. एवढेच नाही तर पार्वतीच्या नातेवाईकांनीही तिच्याशी संबंध तोडले. पण ती तिच्या हेतूवर ठाम राहिली.
नोकरीपेक्षा जास्त कमाई
बीएससी चायवाली पार्वती तिच्या चहाच्या स्टॉलमधून दररोज 1000-1200 रुपये कमावते. यानुसार एका महिन्यात 30 हजारांहून अधिक उत्पन्न मिळते. हे पार्वतीच्या नोकरीच्या पगारापेक्षा जास्त आहे. एमबीए चाय वाला प्रफुल्ल बिलोर यांच्यापासून प्रेरणा घेऊन पार्वतीने चहाचे दुकान सुरू केले आहे.
चहाचे फ्लेवर्स प्रसिद्ध
पार्वतीच्या दुकानात अनेक फ्लेवर्सचे चहा मिळतात. एक कप चहाची किंमत 10-15 रुपये आहे. सेक्टर 16 मध्ये दुकान असल्याने मोठ्या कंपन्यांचे लोक चहा घेण्यासाठी रांगा लावतात. सामान्य चहा व्यतिरिक्त, पान चहा, चॉकलेट चहा आणि मसाला चहा देखील BSC चायवलीच्या चहाच्या स्टॉलवर उपलब्ध आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"