कच्छ - भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गुजरात येथील कच्छ सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने एका 50 वर्षीय संशयित पाकिस्तानी नागरिकाला अटक केली.
बीएसएफ आणि सुरक्षा यंत्रणांकडून या संशयित पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू आहे. सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ याला अटक केली. कच्छच्या खावडा पिलर नंबर 1050 जवळ संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हा परिसर निर्मनुष्य असल्याने या ठिकाणाहून पाकिस्तानी नागरिक भारताच्या सीमेत दाखल झाला.
बीएसएफने संशयिताला पकडून पोस्टवर नेल्यानंतर त्याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. सुरक्षा यंत्रणेचे अधिकारीही बीएसएफच्या पोस्टवर दाखल झाले असून भारतात घुसण्यामागचा नेमका हेतू काय ? काही संशयास्पद वस्तू आहेत का याची अधिकारी चौकशी करत आहेत.
पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात हायअलर्ट असल्याने सुरक्षा यंत्रणा अनेक ठिकाणी सज्ज आहेत. या हल्ल्यात सीआऱपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना खतपाणी देणे बंद न केल्यास भारत चोख प्रत्युत्तर देईल असा इशाराही भारताने पाकिस्तानला दिला होती. त्यानंतर पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले.