रेवाडी: लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट आरोप केल्यानं चर्चेत आलेले बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी हे आत्महत्येचं प्रकरण असल्याची माहिती दिली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेले जवान तेज बहादूर यादव यांचा 22 वर्षीय मुलगा रोहितचा मृतदेह काल रेवाडीतील शांती विहार कॉलनीमधील राहत्या घरी आढळून आला. दिल्ली विद्यापीठात शिकणारा रोहित त्याच्या घरी आला होता. रोहितचे वडील तेज बहादूर कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले आहेत. रोहितची आई गुरुवारी संध्याकाळी कार्यालयातून घरी परतली. त्यावेळी रोहितची खोली बंद होती. अनेकदा प्रयत्न करुनही दरवाजा न उघडल्यानं त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
बीएसएफमधील जेवणाची तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 07:59 IST