फतेहपूर: जम्मू-काश्मीरमध्ये देशाचं रक्षण करताना सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण आलं. यामध्ये उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील विजय पांडे यांचा समावेश आहे. 20 जून रोजी विजय यांचा विवाह होणार होता. मात्र ज्या घरात काही दिवसानंतर लगीनघाई पाहायला मिळणार होती, त्या घरात आता आक्रोश ऐकू येत आहे. फतेहपूरमधील सठिगवा गावात विजय पांडे यांना अंतिम निरोप देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. विजय पांडे यांच्या लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकादेखील वाटण्यात आल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अखनूरमध्ये कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानच्या गोळीबारात विजय पांडे शहीद झाले. पांडे यांना रविवारी वीरमरण आलं. यावर्षी आतापर्यंत 18 जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबारात आणि दहशतवाद्यांशी दोन हात करताना हौतात्म्य पत्करलं आहे. तर जवानांच्या कारवाईत आतापर्यंत 80 हून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. बीएसएफचे जम्मू फ्रंटियरचे महानिरीक्षक राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्यानं रात्री सव्वाच्या सुमारास प्रगवालमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार सुरू केला. पाकिस्तानच्या सैनिकांनी सीमावर्ती भागातील भारतीय चौक्यांना लक्ष केलं. यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक एस. एन. यादव आणि कॉन्स्टेबल व्ही. के. पांडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारामुळे सीमावर्ती भागातील स्थानिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
जय जवान... लग्नाला उरले होते फक्त १७ दिवस, घरी आलं तिरंग्यात लपेटलेलं पार्थिव!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 3:41 PM