नवी दिल्ली : पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक पाकिस्तानच्या दोन सशस्त्र घुसखोरांना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुरुवारी ठार केले. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बीएसएफच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, भारतीय हद्दीत संशयित हालचाली दिसून आल्यानंतर गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास राजताल सीमा चौकीजवळ या दोन घुसखोरांना ठार करण्यात आले. घटनास्थळी एक एके ५६ रायफल, एक अन्य रायफल, एक पिस्तूल, ९० गोळ्या, दहा फुटांचा पाइप आदी वस्तू जप्त करण्यात आल्या. बीएसएफच्या प्रवक्यांनी सांगितले की, राजतल सीमा चौकीजवळ गुरुवारी पहाटे २.२०च्या सुमारास जवानांना संशयित हालचाल दिसून आली. याच वेळी त्या संशयितांनी बंदूक उचलल्याचा आवाज आला. त्यामुळे बीएसएफच्या जवानांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यात दोघेही घुसखोर ठार झाले, असे बीएसएफचे उपमहानिरीक्षक भूपिंदर सिंग यांनी सांगितले. या दोन्ही घुसखोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. घटनास्थळाहून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेत भरखलिस्तानी चळवळ सुरू असताना त्यावेळी पंजाबमार्गे भारतात घुसखोरी होत होती. मात्र, त्यानंतरच्या काळात काश्मीरातून घुसखोरी होण्याचे प्रमाण वाढले. पुन्हा पंजाबमार्गे घुसखारीचा प्रकार समोर आल्याने काळजी व्यक्त होत आहे.
पाकच्या दोन घुसखोरांना ठार केले; मोठा शस्त्रसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 3:51 AM