श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अतिउंच भागात एका चौकीवर तैनात असलेल्या सैनिकाला त्याच्या लग्नासाठी वेळेवर पोहोचता यावे म्हणून बीएसएफने एका विशेष हेलिकॉप्टरद्वारे त्याला गुरुवारी श्रीनगरला नेले. तिथून हा सैनिक आपल्या गावी रवाना झाला.
काश्मीरमधील मचिल क्षेत्रात एका चौकीवर बीएसएफचा नारायण बेहरा (३०) हा सैनिक तैनात होता. नारायण हे ओडिशातील ढेंकानाल जिल्ह्यातील आदिपूर या गावचे मूळ रहिवासी असून, तिथे त्यांचा २ मे रोजी विवाह होणार आहे. ते ज्या लष्करी चौकीवर तैनात होते तो सारा बर्फाळ प्रदेश आहे. तिथून गुरुवारी निघून रस्तामार्गे श्रीनगर गाठण्यासाठी किमान एक-दोन दिवस लागले असते व त्यानंतर श्रीनगरहून ओडिशातील गावापर्यंतचा प्रवास लक्षात घेतला तर नारायण हे आपल्या लग्नाच्या मुहूर्ताला वेळेवर पोहोचण्याची कमी शक्यता होती.
ही गोष्ट नारायण बेहरा यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातली. बीएसएफचे काश्मीर विभागाचे महानिरीक्षक राजेशबाबू सिंह यांनी नारायण यांना चित्ता हेलिकॉप्टरने तातडीने श्रीनगरला सोडण्याचे आदेश दिले. (वृत्तसंस्था)