नवी दिल्ली : दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. याताच आता पंजाबमधील हुसैनीवाला सेक्टरमध्ये तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना भारत-पाकिस्तान सीमेवर तीन ड्रोन दिसले आहेत. यासंबंधीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सोमवारी रात्री पाकिस्तानकडून येणारे संशयित ड्रोन्स पाहिले. त्यानंतर जवानांनी यावर गोळीबार सुद्धा केला.
या महिन्याच्या सुरुवातीला येथील राम लाल, टेंडीवाला आणि हजारा सिंहवाला गावातील लोकांनी ड्रोन पाहिले होते. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना अलर्ट करण्यात आला होता. तेव्हापासून सीमा सुरक्षा दवाचे जवान आणि पंजाब पोलीसांनी शोध मोहीम राबविली होती. मात्र, यावेळी काही यासंबंधी संशयीत असे काही आढळून आले नाही. त्यावेळी सीमेवरील गावातील लोकांना असे सूचित करण्यात आले होते की, कोणतीही संशयित वस्तू दिसल्यास लगेच पोलीस किंवा सीमा सुरक्षा जवानांना कळवण्यात यावे.
दरम्यान, पंजाब सीमेवर ड्रोन दिसण्याच्याआधी एक दिवस म्हणजेच गेल्या रविवारी दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार करण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या या नापाक कारवायांविरोधात भारतीय लष्कराने धडक मोहीम हाती घेत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. गेल्या रविवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत पाकिस्तानचे सैनिक आणि अनेक अधिक दहशतवादी ठार झाले.