नवी दिल्ली - दंगलीच्या भीषण आगीत होरपळणल्यानंतर आता राजधानी दिल्लीतील जनजीवन हळुहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, दिल्लीत उफाळलेल्या जातीय द्वेषाच्या आगीदरम्यान माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या. अनेकांचा बळी गेला. देशाच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफच्या एका जवानाचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले. आता, या जवानाचे घर उभारण्यासाठी मित्रपरिवार आणि बीएसएफमधील सहकारी पुढाकार घेत आहेत.
बीएसएफकडून सोमवारी जवान मोहम्मद अनिस यांना 10 लाख रुपयांच्या मदतीचा चेक देण्यात आला. दिल्लीतील बीएसएफच्या मुख्यालयात आयजी डी.के. उपाध्याय यांनी मोहम्मद यांच्याकडे हा चेक प्रदान केला, त्यावेळी मोहम्मद यांचे वडिलही उपस्थित होते. दिल्लीतील परिस्थिती अतिशय गंभीर बनली होती, पण आता सर्वच पूर्वपदावर येत आहे. माझ्या सहकारी आणि मित्रांनी मला मदत केली. मी बीएसएफचा एक भाग आहे, हे मी माझं भाग्य समजतो, असे यावेळी मोहम्मद यांनी म्हटले.
मोहम्मद अनिस हे बीएसएफमध्ये सेवेत असून ते सध्या ओडिशा येथे कार्यरत आहेत. दिल्लीत दंगल भडकल्यावर खजूरी खास परिसरात असलेले अनिस यांचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले. दैव बलवत्तर म्हणून अनिस यांचे कुटुंबीय बचावले. मात्र, राहते घरच बेचिराख झाल्याने अनिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. मोहम्मद अनिस यांचा तीन महिन्यांनंतर विवाह होणार आहे. दरम्यान आपल्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या संकटाची माहिती अनिस यांनी आपल्या वरिष्ठांना दिली नव्हती.
अखेरीस प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमधून ही गोष्ट त्यांच्या वरिष्ठांना समजली. त्यानंतर बीएसएफने आपल्या जवानाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. बीएसएफने एका जवानाच्या माध्यमातून अनिस यांच्या वडिलांशी संपर्क साधला आहे. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आज बीएसएफकडून अनिस यांना 10 लाख रुपयांचा चेक देऊन मदत करण्यात आली. दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही अनिस यांना 10 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे सांगितले आहे. तर, घर बांधून देण्यासाठी बीएसएफ जवान आणखी मदत करणार असल्याचे बीएसएफमधील अधिकाऱ्यांनी सांगितलंय.