नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कर्मचाऱ्यांसाठी असलेली दारू नागरिकांना विकली जात असल्याच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश बीएसएफने दिले आहेत. बीएसएफच्या एका कारकुनाने फेसबुकवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये त्याने बीएसएफच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली दारू नागरिकांना विकली जाते व त्याबद्दल तक्रार केल्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप केलेला आहे. पूंछमधील २९ व्या बटालियनमधील बीएसएफ जवानाने अतिशय वाईट दर्जाचे अन्न जवानांना दिले जात असल्याची तक्रार करणारा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आता हा ताजा व्हिडिओ आला आहे. राजस्थानमधील बिकानेरचा रहिवासी असलेला चौधरी नावाचा हा बीएसएफ जवान गांधीधाम (जि. कच्छ, गुजरात) येथील १५० व्या बटालियनमध्ये नियुक्त आहे. त्याने २६ जानेवारी रोजी व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओमध्ये नागरिक दारुच्या बाटल्या घेऊन जाताना दिसतो. गुजरातमध्ये दारुची विक्री आणि दारू पिण्यावर बंदी आहे. या व्हिडिओमध्ये चौधरी म्हणतो की, आमच्या घटनेने सगळ््या नागरिकांना समान हक्क बहाल केलेले आहेत. परंतु आम्हाला त्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. (वृत्तसंस्था)
बीएसएफमधील दारूविक्रीची होणार चौकशी
By admin | Published: January 31, 2017 12:24 AM