नवी दिल्ली: पाकिस्तानच्या नापाक कारवाया पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. पाकिस्तानने अनेकदा भारतामध्ये ड्रग्स पाठवल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बीएसएफने स्थानिक पोलिसांसोबत संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात हेरॉईनची जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचार्यांना बारमेर जिल्ह्यातील पंचला गावाजवळील झुडूपात 14 किलो हेरॉईन सापडले आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 35 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हेरॉईन तस्कराचा शोध घेत असताना एसओजीच्या पथकाला झुडपात ठेवलेली पोती दिसली. हेरॉईन जप्त केल्यानंतर एसओजीने याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली.
सीमाभागातून हेरॉईन तस्करीचे प्रकरण समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हेरॉईनची ही खेप सीमेपलीकडून पाकिस्तानातून कधी आली आणि भारतीय हद्दीत या हेरॉईनची डिलीव्हरी कोणी केली, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. संपूर्ण परिसरात शोध मोहिम राबवण्यात आली आहे.