नवी दिल्ली, दि. 27 - सीमारेषेवर गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. पाकिस्तानकडून वारंवार होणा-या हल्ल्यांमध्ये गेल्या काही दिवसांत कित्येक भारतीय जवान शहीद झालेत, गावांवर होणा-या गोळीबारात अनेक ग्रामस्थही मृत्यूमुखी पडलेत तसंच जखमीही झालेत. या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानकडून स्नायपर्सचा वापर करण्यात आला होता. पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी वारंवार होणा-या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बीएसएफनं 'ऑपरेशन अर्जुन' राबवले आणि या ऑपरेशनमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं असून त्यानं भारतापुढे गुडघे टेकले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन अर्जुनअंतर्गत बीएसएफनं विशेषतः पाकिस्तानातील माजी सैनिक, आयएसआय आणि पाकिस्तानी रेंजर्स अधिका-यांची निवासस्थानं आणि शेत अशा परिसराला टार्गेट करण्यात आले ज्यामुळे पाकिस्तानचं सर्वाधिक नुकसान होईल. शिवाय, टार्गेट करण्यात आलेल्या या परिसरांचा भारताविरोधी कारवाई करण्यासाठी वापर केला जातो.
'ऑपरेशन अर्जुन'अंतर्गत भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्तानला तीन दिवसांपूर्वी गोळीबार थांबवण्याची विनंती करावी लागली. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान रेंजर्सचे पंजाब प्रांतचे डीजी मेजर जनरल अजगर नवीद हायत खान यांनी बीएसएफचे संचालक के.के.शर्मा यांना गोळीबार थांबवण्याची विनंती करण्यासाठी आठवड्यातून दोनदा संपर्क केला. यावेळी शर्मा यांनी पाकिस्तानकडून विनाकारण होणारा गोळीबार व हल्ला यावर तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. शर्मा यांना पाकिस्तानकडून 22 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर रोजी संपर्क करण्यात आला.
शर्मा यांनी यावेळी खान यांना सांगितले की, 12 चिनाब रेसर्जंचा कमाडिंग ऑफिसर असलेला तुमचा ज्युनिअर लेफ्टनंट कर्नल इरफानची चिथावणीखोर वागण्याच्या प्रवृत्तीमुळे दोन्ही बाजूंनी गोळीबार होण्याचा धोका वाढत आहे. दरम्यान, ऑपरेशन अर्जुन अंतर्गत बीएसएफनं छोट्या, मध्यम शस्त्रास्त्रांचा वापर केला. ज्यामुळे पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत पाकिस्तानचे 7 सैनिक आणि 11 नागरिक मारले गेले आहेत.
लांब-श्रेणीच्या 81 मिमीपर्यंत मारा करणा-या शस्त्रांचा वापर केल्यानं पाकिस्तानी लष्कर आणि सैनिकांची कित्येक तळं यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, या ऑपरेशनबाबत सांगताना भारतीय लष्करातील अधिका-यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून वारंवार होणा-या गोळीबाराच्या कारणास्तव बीएसएफनं सीमारेषेवर पुन्हा आपलं ऑपरेशन आखण्याची तयारी केली व ते अंमलात आणले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन अर्जुन गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होते. गेल्यावर्षी भारताने 'ऑपरेशन रूस्तम' सुरू करून पाकिस्तानच्या अक्षरशः नाकीनऊ आणले होते. याच धर्तीवर 'ऑपरेशन अर्जुन' सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी 'ऑपरेशन अर्जुन' सुरू करण्यात आलं होतं. सीमा सुरक्षा दलाच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्ताननं गुडघे टेकले आहेत.