ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - रिलायन्स जिओनं दिलेल्या 4जीच्या फ्री डेटामुळे ग्राहकांची संख्या लाखांच्या वर गेली असताना त्याची धास्ती घेत प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही मोफत कॉलिंग आणि फ्री 4जी डेटाचे अनेक प्लॅन बाजारात आणले आहेत. विशेषतः या स्पर्धेत भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी दूरसंचार कंपनीही सहभागी झाली आहे. बीएसएनएलनं एक जबरदस्त प्लॉन लाँच केला आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये फक्त 339 रुपयांमध्ये ग्राहकांना दररोज दोन जीबी 3जी डेटा मोफत मिळणार आहे. तसंच देशभरात कुठेही तुम्हाला बीएसएनएल टू बीएसएनएल अनलिमिटेड मोफत कॉलिंग करता येणार आहे. गुरुवारी बीएसएनएलनं हा प्लॅन लॉन्च केला आहे.बीएसएनएलच्या या ऑफरनुसार ग्राहकाला बीएसएनएल टू बीएसएनएल अनलिमिटेड मोफत कॉलिंग करता येणार आहे. तसंच 28 दिवसांपर्यंत त्यांना दररोज दोन जीबी डेटा वापरता येणार आहे. मात्र हा प्लॅन फक्त 90 दिवसांपुरताच मर्यादित आहे. सध्या तरी रिलायन्स जियो 31 मार्चपर्यंत दररोज एक जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल मोफत देत आहे. मात्र 1 एप्रिलपासून रिलायन्स जियो या सुविधेसाठी युझर्सला 99 रुपयांचं रजिस्ट्रेशन शुल्क भरून प्राइम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर 303 रुपये महिन्याभरासाठी मोजावे लागणार आहेत. रिलायन्स जिओची ही ऑफर 31 मार्च 2018 पर्यंत असणार आहे.
(एअरटेल धमाका, 145 रूपयांत 14 जीबी 4G आणि कॉल्स फ्री)(एअरटेल धमाका: 345 रूपयांत 28 जीबी 4G आणि कॉल्स फ्री)बीएसएनएलनं हा नवा प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करून देताना हा सर्वोत्तम प्लॅन असल्याचं म्हटलं आहे. दररोज 2 जीबी डेटाची ऑफर दूरसंचार उद्योग क्षेत्रातली जबरदस्त ऑफर ठरणार आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना अल्प दरात चांगली सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. सध्याची मार्केटमधली स्थिती पाहता आम्हाला ग्राहकांसाठी हा प्लॅन लाँच करावा लागला आहे. बीएसएनएल ते इतर कंपन्यांच्या ग्राहकांशी बोलण्यासाठी आम्ही रोज 25 मिनिटे मोफत देणार आहोत. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक मिनिटांना 25 पैसे दर आकारला जाणार असल्याची माहिती बीएसएनएलचे डायरेक्टर (कन्ज्झुमर मोबिलिटी) आर. के. मित्तल यांनी दिली आहे.