ऑनलाइन लोकमत -
रामपूर (उत्तरप्रदेश), दि. १६ - बहुजन समाज पक्ष (बसप) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या राजकीय फायद्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केला आहे. विद्यापीठात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे हा भाजपचा राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न आहे. जयंतीअगोदर कधीच आंबेडकरांना श्रद्धांजली का वाहिली जात नाही ?', असा सवाल आझम खान यांनी विचारला आहे. 'मायावती यांचा बीएसपी पक्षदेखील फायद्यासाठीच आंबेडकरांची जयंती साजरी करतं, आणि काँग्रेसदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतं आहे', असं आझम खान यांनी म्हटलं आहे.
'भाजपने राजकीय पक्ष म्हणून विश्वासार्हता गमावली आहे . लोक त्यांना खोटं बोलणारे आणि खोटी आश्वासने देणा-यांचं प्रतिक संबोधू लागले आहेत. त्यामुळे भाजपा आंबेडकरांच्या नावाचा वापर करत आहे', असा आरोप आझम खान यांनी केला आहे. मायावती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाटकांपासून सावधान राहण्याचा लोकांना इशारा दिला आहे. यावरुनही आझम खान यांनी टीका करत मायावती यांनी भाजपशी हातमिळवणी का केली होती ? याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे.