- शरद गुप्तालाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेशात अखेरच्या टप्प्यात ५४ जागांसाठी उद्या, सोमवारी मतदान होणार आहे. यात बसप किती दाखवितो यावर बरेच काही अवलंबून आहे. बसप अनेक पक्षांचे गणित बिघडवू शकतो. गत निवडणुकीत यापैकी सहा जागा जिंकणारा बसप यंदा अन्य पक्षांना धक्का देऊ शकतो. गत निवडणुकीत २२.२६ टक्के मते मिळवून बसपा दुसऱ्या स्थानावर होता. हा पक्ष पाच वर्षांपर्यंत निष्क्रिय होता. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर काही दिवसांपर्यंत अध्यक्ष मायावती प्रचारासाठी घरातून बाहेर पडल्याच नाहीत.
पहिल्या टप्प्यात ज्या ५८ जागांवर निवडणुका झाल्या त्या जागांवर २०१२ मध्ये बसपने २० जागा जिंकल्या होत्या. पण, २०१७ मध्ये यापैकी केवळ दोन जागा जिंकता आल्या, तर ३२ जागांवर बसप दुसऱ्या स्थानावर होता. पण, यंदा पश्चिम उत्तर प्रदेशात लढाई सप-रालोद आघाडीत आणि भाजपत दिसून आली.
बसप उमेदवार काही जागांवरच स्पर्धेत आहेत. याच कारणामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की, बसप स्पर्धेत आहे आणि अनेक जागांवर अल्पसंख्याक त्यांना मते देत आहेत. यामुळे सपला एकगठ्ठा मते देणारे अल्पसंख्याक विभाजित होऊ शकतात. पश्चिम उत्तर प्रदेशच्या तुलनेत बसप यंदा पूर्व उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. गोरखपूर ते वाराणसीपर्यंत अनेक जागांवर बसप उमेदवार मजबुतीने लढताना दिसत आहेत.
मायावती काय म्हणाल्यामायावती यांनी म्हटले आहे की, बसप केडर आधारित पार्टी आहे. मतदारांना सक्रिय करण्यासाठी आम्हाला इतर पक्षांप्रमाणे रोड शो करावे लागत नाहीत. कारण, कोरोना काळातही पक्षाचे लहान लहान कार्यकर्ता संमेलन सुरूच होते.
अपेक्षा पूर्ण होणार काभाजप नेत्यांना अशी अपेक्षा होती की, बसपचे १० ते १२ टक्के मते विभागले जातील. यातील एक मोठा हिस्सा त्यांना मिळेल. पण, पूर्व उत्तर प्रदेशात असे होताना दिसत नाही.