लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्येही प्रचाराचा ज्वर टीपेला पोहोचला आहे. दरम्यान येथील एका मतदारसंघात असाही एक उमेदवार आहे जो फरार आहे. मात्र त्याच्या प्रचारासाठी दिग्गज नेते पोहोचत आहेत. तसेच कार्यकर्तेही जोरदार प्रचार करत आहेत. या उमेदवाराचे नाव आहे अतुल राय. सपा-बसपा महाआघाडीचे उमेदवार अतुल राय यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणामध्ये अजामिनपात्र वॉरंट निघालेले आहे. त्यामुळे ते फरारी झाले आहेत. अतुल राय हे उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यातील घोसी लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्याविरोधात एका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून वाराणसीमधील लंका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना अतुल राय यांना 23 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले असून, प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे.
अजबच! उमेदवार फरार, नेते आणि कार्यकर्ते करताहेत प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 3:30 PM