नवी दिल्ली - राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने मायावती संतप्त झाल्या आहेत. पक्षाला खिंडार पडल्याने संतप्त झालेल्या मायावती यांनी आज ट्विटरवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसमुळेच देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला. आपल्या ट्विटमध्ये मायावती म्हणतात, ''काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी भूमिकेमुळे देशात जातीयवादी शक्ती मजबूत होत आहेत. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्ष अशा जातीयवादी, सांप्रदायिक शक्तींना कमकुवत करण्याऐवजी त्या शक्तींविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच कमकुवत करण्यात गुंतली आहे. त्यामुळे जनतेने सावध राहिले पाहिजे.''
तत्पूर्वी, बसपाचे सहा आमदार फुटून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मायावती यांनी मंगळवारी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाच्या सरकारने पुन्हा एकदा बसपाच्या आमदारांना फोडून आपण अविश्वासार्ह आणि दगाबाज पक्ष आहोत हे सिद्ध केले आहे. ही घटना म्हणजे बसपा चळवळीसोबत झालेला विश्वासघात आहे, असा आरोप त्यांनी केला होता. बसपाच्या सहा आमदारांनी केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश राजस्थान विधानसभेतील बहुजन समाज पक्षाचे सर्व सहा आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले असून त्यांनी आपला विधिमंडळ पक्षही सत्ताधारी पक्षात विलीन केला होता. यामुळे काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारचे संख्याबळ १०६ झाले आहेत.बसपच्या या आमदारांनी आपल्या या निर्णयाचे अधिकृत पत्र सोमवारी मध्यरात्री विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी दिले. आधी हे आमदार काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देत होते. सरकारला अधिक स्थैर्य यावे व विकासाला गती मिळावी, यासाठी हे पक्षांतर केल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे.विधानसभेत काँग्रेसला ११९ आमदारांचा पाठिंबा आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दलाचा एक तर १३ अपक्षांपैकी १२ आमदारांचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारला पाठिंबा आहे. बसपतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सहा आमदारांमध्ये जोगिंदरसिंह आवना, दीपचंद, राजेंद्रसिंह गुढा, लखनसिंह, वाजिब अली, संदीपकुमार यांचा समावेश आहे.