नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या आईचे निधन झाले आहे. माँ रामरती देवी यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्या कुटुंबीयांसमवेत त्या दिल्लीतील रकाबगंज परिसरात राहत होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. माँ अतिशय प्रामाणिक आणि निर्मळ मनाच्या होत्या, असे मायावती यांनी म्हटले.
आपल्या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. शेवटपर्यंत त्यांनी कुटुंबीयांसमेवत जीवन व्यतीत केलं. सर्वच नागरिकांसाठी ती एक प्रेरणा आणि शक्तीचा स्त्रोत असल्याचेही मायावती यांनी म्हटले. आईच्या निधनाचे वृत्त समजताच मायावती तात्काळ दिल्लीकडे रवाना झाल्या. माँ यांच्या निधनानंतर बसपाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्या पुज्य माताजी श्रीमती रामरती यांचे निधन झाल्याचे वृत्त अतिशय दु:खद आहे. प्रभू श्रीराम दिवंगत आत्म्याला चरणांमध्ये स्थान देईन. तसेच, कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती द्यावी, असे ट्विट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. तर अखिलेश यादव यांनीही ट्विट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.