नवी दिल्ली - मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला हिट ठरल्यानंतर काँग्रेसने गरिबांना साद घातली. 'काँग्रेस पक्षाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर लगेचच देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल', असे आश्वासन राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील जाहीर सभेत दिलं आहे. मात्र राहुल गांधींच्या किमान उत्पन्नाच्या हमीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निशाणा साधला आहे. तसेच भाजपा आणि काँग्रेस दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे.
मायावती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी घोषणा केलेल्या किमान उत्पन्नाच्या हमीची ‘गरिबी हटाव’ घोषणेशी तुलना केली आहे. राहुल गांधींनी दिलेले हे आश्वासन इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये दिलेल्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणेच हे एक आश्वासन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी अशी आश्वासनं देण्याआधी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करावी असंही मायावती यांनी म्हटलं आहे.
मायावतींचा 'व्हॉट्सअॅप नंबर' सोशल मीडियात व्हायरल
राहुल गांधींनी दिलेले हे आश्वासन ‘गरिबी हटाव’ प्रमाणेच आहे. भाजपा सरकारने काळ्या पैशाविरोधात आश्वासन दिले होते. त्यांनी देशातील प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आणि अच्छे दिनचे आश्वासन दिले होते. मात्र भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे.