नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला बहुतांश विरोधी पक्ष विरोध करत आहेत. संसदेच्या नवीन भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. मात्र, याचदरम्यान बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सुप्रीमो मायावती यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.
28 मे रोजी होणाऱ्या संसदेच्या नवीन भवनाच्या उद्घाटनाला बसपने पाठिंबा दिला आहे. "केंद्रात याआधी काँग्रेसचे सरकार असो किंवा आता भाजपचे असो, बसपने देश आणि जनहिताशी संबंधित मुद्द्यांवर नेहमीच पक्षीय राजकारणाच्या वरती उठून त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच, 28 मे रोजी होणाऱ्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन सुद्धा याच संदर्भात पाहून त्याचे स्वागत करतो", असे बसपा सुप्रीमो मायावती यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
"राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन करण्यात येत नाही. यावरून बहिष्कार घालणे अनुचित आहे. सरकारने नवीन संसदेची निर्मिती केली आहे. त्यामुळे नवीन संसदेचे उद्घाटन करण्याचा अधिकार त्यांना आहे. तसेच, आदिवासी महिलांच्या सन्मानाशी त्याचा संबंध जोडणे सुद्धा उचित नाही. त्यांना बिनविरोध निवडून देण्याऐवजी त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करताना विचार करायला हवा होता, असा टोला मायावतींनी ट्विटद्वारे विरोधकांना लगावला आहे.
याचबरोबर, मायावती यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "मला देशाला समर्पित कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले आहे, म्हणजे नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचे, ज्यासाठी आभार आणि माझ्या शुभेच्छा. परंतु पक्षाच्या सततच्या आढावा बैठकांबाबत माझ्या पूर्वनियोजित व्यस्ततेमुळे मी त्या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही."
दरम्यान, यापूर्वी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याबाबत मायावती यांनी म्हटले होते की, "जिथे सत्तेचा अभिमान आहे, विरोधकांचा मान नाही, अशा संसदेच्या उद्घाटनाला कशाला जायचे. जिथे सत्तेचा अभिमान आहे पण विरोधकांचा आदर नाही, ही खरी संसद होऊ शकत नाही, तिच्या उद्घाटनाला का जावे?"