नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावतींनी आपल्या पक्षातील आमदार रमाबाई परिहार यांना निलंबित केलं आहे. परिहार यांना पक्षाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याबाबत या आधीच सूचना देण्यात आली होती. मात्र त्यांनतर पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन भूमिका घेतल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे मायावती यांनी जाहीर केले आहे.
एकीकडे नागरिकत्व कायद्यासंदर्भात संपूर्ण देशात वादविवाद आणि हिंसाचार सुरू आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून सतत विरोध होत आहे. मात्र असे असले तरीही काहीजण या काद्याद्याच्या समर्थनात घोषणाबाजी करत असून अनेक ठिकाणी रॅली काढण्यात येत आहे.
दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या आमदाराला नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणे महागात पडले. मध्य प्रदेशातील पठारा विधानसभा मतदार संघातून बसपाच्या आमदार रमाबाई परिहार यांना नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याप्रकरणी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी निलंबित केलं आहे.
मायावती यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, नागरिकत्व कायदा असंवैधानिक असल्याचे व त्याला विरोध करण्याची भूमिका सर्वप्रथम बहुजन समाज पक्षाने घेतली होती. तसेच आमच्या पक्षाने संसदेमध्येही याविरोधात मतदान केले व माघार घेण्याबाबत राष्ट्रपतींना निवेदन सुद्धा दिले. मात्र असे असून सुद्धा आमदार रमाबाई परिहार यांनी नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करत असल्याचे मायावती यांच्याकडून सांगण्यात आले आहे.