आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या विरोधी पक्षांना मायावती यांच्या बसपाचा सुद्धा इंडिया आघाडीत समावेश करायचा आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे अनेक नेते येत्या 15 जानेवारीला मायावतींना भेटू शकतात. या दिवशी बसपा सुप्रीमो मायावती यांचा वाढदिवस आहे. यादरम्यान, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच काँग्रेस नेते मायावती यांच्याशी इंडिया आघाडीत सामील होण्याबाबत चर्चा करू शकतात.
मायावतींसोबत चर्चा झाल्यानंतर काँग्रेस नेते समाजवादी पक्षासोबत बैठक घेणार आहेत. दरम्यान, जागावाटपाबाबात समाजवादी पक्षाने आपल्या भूमिकेवर ठाम राहून काँग्रेसला फार कमी जागा दिल्या, तर अशा परिस्थितीत काँग्रेस 'प्लॅन बी' बनवून काम करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला बसपासोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याची शक्यता कायम ठेवायची आहे.
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात शुक्रवारी होणारी बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली. दिल्लीत दुपारी चार वाजता समाजवादी पक्ष आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक होणार होती, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. आता ही बैठक 15 जानेवारीला होऊ शकते, असे म्हचले जात आहे. मायावतींची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या संदर्भात समाजवादी पक्षच्या नेत्यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारींना या बैठकीसंदर्भात काही होमवर्क करायचा होता, जो पूर्ण झाला नाही आणि कार्यक्रमामुळे प्रदेशाध्यक्ष दिल्लीला पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे ही बैठक होणार नाही. पुढील एक-दोन दिवसात बैठक होईल.
दरम्यान, मंगळवारी इंडिया आघाडीत समाविष्ट यूपीमधील पक्षांची प्राथमिक बैठक झाली. समाजवादी पक्षाला 60 हून अधिक जागांवर निवडणूक लढवायची आहे आणि उर्वरित जागा आघाडीच्या भागीदारांना देण्याचा प्रस्ताव आहे, ज्यात काँग्रेसचाही समावेश आहे, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, यूपीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.