बसपानं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन, घेतला मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात मायावतीनी उभं केलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 07:17 PM2024-03-14T19:17:04+5:302024-03-14T19:17:42+5:30
Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र आता बहुजन समाज पार्टीने काँग्रेसचं टेन्शन वाढवलं आहे.
लोकसभा खासदारांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था निराशाजनक झाली होती. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. तसेच जागावाटपाता १७ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र आता बहुजन समाज पार्टीने काँग्रेसचं टेन्शन वाढवलं असून, काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत.
बसपाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी याबाबत सांगितले की, बसपा अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवार उतरणार आहे. आम्ही आधीही या मतदारसंघात उमेदवार उतरवत होतो. तसेच यावेळी आम्ही काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या या मतदारसंघांमधून उमेदवार उतरवणार आहोत. दरम्यान, मायावती सच्चिदानंद पांडेय यांना अयोध्येमधून उमेदवार बनवतील, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना विश्वनाथ पाल यांनी सांगितले की, याबाबत बसपाप्रमुखांकडून ज्या सूचना येतील त्यांची अंमलबजावणी केली जाईल.
सच्चिदानंद पांडेय यांनी हल्लीच भाजपाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते बसपाच्या तिकिटावर अयोध्येमधून निवडणूक लढवतील, असे बोलले जात होते. अयोध्येतून ब्राह्मण उमेदवार का उतरवणार असं विचारलं असता विश्वनाथ पाल यांनी सांगितले की, बसपा सर्व समाजाच्या सहभागाची भूमिका मांडत असते. जर पांडेय यांना उमेदवार बनवलं ती काही फार मोठी बाब नसेल.
हा देश विविध धर्मांचा देश आहे. राजकारणात धर्माला आणता कामा नये. माझ्या मते देशाचा विकास कसा होईल. बंधुत्व कसं वाढेल. रोजगार कसा मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, या मुद्द्यांवरून मतदान झालं पाहिजे. तसेच यावेळी तसं मतदान होईल. बसपाप्रमुखांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. समाजाची आघाडी हीच सर्वात मोठी आघाडी असते. त्यासमोर कुणाचं काही चालत नाही. आम्ही आघाडी करणार असल्याचा चर्चा बिनबुडाच्या आहेत. आम्ही अमेठी आणि रायबरेलीमधूनही उमेदवार उतरवणार आहोत, असेही विश्वनाथ पाल यांनी सांगितले.