मुरादाबाद : भाजपा आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे.
मायावती यांच्यावर साधना सिंह यांनी आपेक्षार्ह टीका केल्यांनतर येथील बसपा नेते संतप्त झाले आहेत. बसपाचे माजी आमदार विजय यादव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साधना सिंह यांचे शीर कापून घेऊन येईल, त्याला 50 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा विजय यादव यांनी केली आहे.
चंदोलीमधील मुगलसराय मतदार संघातील आमदार असलेल्या साधना सिंह गेल्या दोन दिवसांपूर्वी परनपुरा गावातील किसान कुंभ अभियान कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मायावतींवर टीका केली. त्या म्हणाल्या, ''जेव्हा द्रौपदीचे वस्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. मात्र सपाने मायावतींचे वस्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपासोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला आहे.'' मात्र, साधना सिंह एवढ्यावरच थांबल्या नाहीत. मायावती या ना पुरुष दिसतात ना स्त्री, असे अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले.
दरम्यान, साधना सिंह यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी माफीनामा सादर केला आहे. यामध्ये साधना सिंह यांनी असे म्हटले आहे की, मला कुणाला दुखवायचे नव्हते. मात्र, माझ्या भाषणातून कुणाला ठेच पोहोचली असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करते, अशा शब्दांत साधना सिंह यांनी माफी मागितली आहे.
तसेच, याप्रकरणी चंदोली येथील बबुरी पोलीस स्टेशनमध्ये बसपा नेता रामचंद्र गौतम यांनी साधना सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.