लखनऊ: लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं आघाडी केली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावतींनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली. या पत्रकार परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांची झोप उडाली असेल, असं मायावती आघाडीची घोषणा केल्यानंतर म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीआधी झालेली ही आघाडी राजकारणात क्रांती घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यातील प्रत्येकी 38 जागा लढवणार असल्याची माहिती मायावतींनी दिली. तर दोन जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. याशिवाय अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये दोन्ही पक्ष उमेदवार देणार नाहीत. काँग्रेससाठी दोन मतदारसंघ सोडणाऱ्या मायावतींनी पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि भाजपावर घणाघाती टीका केली. 'भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यशैलीत फारसा फरक नाही. स्वातंत्र्यानंतर बराच काळ काँग्रेस पक्ष सत्तेत होता. बहुतांश राज्यांमध्ये त्यांची सत्ता होती. त्यांच्या सत्ताकाळात गरिबी आणि भ्रष्टाचार वाढला. या दोन्ही पक्षांची विचारधारा जवळपास सारखीच आहे,' अशी टीका त्यांनी केली.पत्रकारांना संबोधित करताना मायावतींनी बोफोर्स आणि राफेल करारांचा उल्लेख केला. 'दोन्ही पक्षांनी संरक्षण करारांमध्ये घोटाळे केले आहेत. आधी काँग्रेसनं बोफोर्स घोटाळा केला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता लवकरच राफेल घोटाळ्यामुळे भाजपाला सत्ता सोडावी लागेल,' असं मायावती म्हणाल्या. उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये आम्ही एकत्र आलो होतो. त्यावेळी भाजपाचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही भाजपावर सडकून टीका केली. देशात सध्या अराजकतेची परिस्थिती आहे. राज्यातील गरिबी वाढली आहे. भाजपाकडून धर्माच्या नावानं राजकारण केलं जात आहे, असं अखिलेश म्हणाले. मायावतींवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांवर त्यांनी शरसंधान साधलं. 'भाजपा नेते मायावतींवर अशोभनीय शब्दांमध्ये टीका करतात. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. आता मायावतींचा सन्मान हा माझा सन्मान आहे आणि त्यांचा अपमान हा माझा अपमान आहे,' असं अखिलेश यांनी म्हटलं.