- संतोष ठाकूरनवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील दलित नेते चंद्रशेखर आझाद रावण यांच्याशी चर्चा केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा संदेश गेला आहे. आपल्या आघाडीतून काँग्रेसला बाहेर ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेणाऱ्या बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यासाठी हा मोठा राजकीय संकेत मानला जात आहे.पश्चिम उत्तर प्रदेशात चंद्रशेखर आझाद रावण यांनी अलीकडच्या काळात दलितांमधील आपली हजेरी वाढविली आहे. तथापि, या चर्चेबाबत बसपामध्ये मोठा असंतोष असल्याची बाब समोर आली आहे. अर्थात, मायावती यांनी या चर्चेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. असे सांगितले जात आहे की, सपा-बसपा आघाडीतून काँग्रेसला बाहेर ठेवण्यात मायावती यांची महत्त्वाची भूमिका होती. यामुळे काँग्रेस नाराज आहे. त्यामुळेच त्यांनी चंद्रशेखर यांच्या निमित्ताने बसपाला राजकीय मात देण्याचा निश्चय केला.चंद्रशेखर आझाद रावण म्हणतात की, ते बहुजन समाजात जन्मले आहेत आणि त्यातच अखेरपर्यंत राहू. मायावतींकडून याच समाजाचे राजकारण केले जाते. आपले नेते म्हणून चंद्रशेखर आझाद रावण हे कांशीराम यांचे नाव घेतात. कांशीराम हे आपले आदर्श असल्याचे ते सांगतात. त्यामुळे बसपा अधिक अस्वस्थ होत आहे. त्यामुळेच चंद्रशेखर यांच्याबाबत मायावती यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, त्यांना पक्षात का घेतले जात नाही? त्याच्या प्रत्युत्तरात त्यांनी सांगितले की, काही लोक लाभ घेण्यासाठी पुढे येऊ इच्छितात. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी चंद्रशेखर आझाद रावण यांच्याशी चर्चा करून हे संकेतही दिले आहेत की, त्या आपल्या पक्षात तरुणांची आणि विशेषत: दलित तरुणांची फौज तयार करण्यात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशात ही उणीव चंद्रशेखर आझाद यांच्या रूपाने समाप्त होताना दिसत आहे. यामुळे काँग्रेसला उत्तर प्रदेशात दलित मते वाढविण्यास मदत तर होईलच; पण एक मजबूत जनाधार असणारा दलित वक्ताही मिळणार आहे.
चंद्रशेखर रावण यांच्या सहकार्याने काँग्रेस देणार बसपाला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 7:03 AM