लखनौ : उत्तर प्रदेशातील ९ जागांच्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल शनिवारी आले. या पोटनिवडणुकीत भाजपने सहा जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, सपा दोन जागांवर तर आरएलडीने एका जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीत एकही जागा न जिंकल्याने बसपा प्रमुख मायावती यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत मायावती यांनी निवडणुकीत बनावट मतदान होत असल्याचा आरोप करत देशात बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग जोपर्यंत कठोर पावले उचलत नाही, तोपर्यंत आमची पार्टी यापुढे देशातील कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही,असे त्यांनी सांगितले.
मायावती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात विधानसभेच्या नऊ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत यावेळी जे मतदान झाले आणि काल जो निकाल आला. त्यावरून लोकांमध्ये अशी सामान्य चर्चा आहे की, यापूर्वी देशात बॅलेट पेपरद्वारे निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा गैरवापर करून बनावट मतं टाकली जात होती. आता आता हे कामही ईव्हीएमच्या माध्यमातून होत आहे, ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे.
देशातील लोकसभा आणि राज्यांतील विधानसभा निवडणुकांबरोबरच विशेषत: पोटनिवडणुकांच्यावेळी हे काम आता अगदी उघडपणे केले जात आहे. हे सर्व आपण नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत पाहिले आहे. तसेच, महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही याबाबत खूप आवाज उठवला जात आहे. ही सुद्धा आपल्या देशासाठी आणि लोकशाहीसाठी मोठी धोक्याची घंटा आहे, असे मायावती यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या, अशा परिस्थितीत आमच्या पार्टीने आता निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत देशातील बनावट मतदान रोखण्यासाठी देशाच्या निवडणूक आयोगाकडून कठोर पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत आमची पार्टी देशातील कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही. आमची पार्टी संपूर्ण तयारी आणि ताकदीने देशातील लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे.