सोनभद्र (उत्तर प्रदेश) : चोपान गटातील एका सरकारी शाळेत माध्यान्न भोजन योजनेचा भाग म्हणून शिक्षकाने बादलीभर पाण्यात एक लिटर दूध मिसळून ते ८१ विद्यार्थ्यांना दिले. याप्रकरणी या शिक्षकाला शुक्रवारी निलंबित केले गेले आहे.पाण्यात दूध मिसळण्याचा प्रकार बुधवारी घडला व त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर आल्यावर हा प्रकार समजला. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, कोटा ग्रामपंचायतच्या ‘शिक्षा मित्र’वर गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये सलाई बन्वा प्राथमिक शाळेतील स्वयंपाकी बादलीभर पाण्यात लिटरभर दूध मिसळताना दिसतो. नंतर हे मिश्रण विद्यार्थ्यांना दिले गेल्याचे दिसले. पाण्यात दूध मिसळण्याच्या प्रकाराची गांभीर्याने नोंद घेऊन जिल्हा दंडाधिकारी एस. राजलिंगन यांनी शुक्रवारी शाळेला भेट देऊन त्या शिक्षकाला (शिक्षा मित्र) निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मूलभूत शिक्षण अधिकारी गोरखनाथ पटेल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
बादलीभर पाण्यात दूध मिसळून विद्यार्थ्यांना दिले; शिक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 2:56 AM