Buddhadeb Bhattacharjee : कोलकाता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगा सुचेतन असा परिवार आहे.
बुद्धदेव भट्टाचार्य हे दक्षिण कोलकाता येथील बल्लीगंज भागात एका साध्या सरकारी अपार्टमेंटमध्ये राहत होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावं लागत होतं. गेल्या वर्षी न्यूमोनिया झाल्यानं त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवावं लागलं होतं. आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. याशिवाय अनेक नेत्यांनी सुद्धा बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव २००० साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती.
बुद्धदेव भट्टाचार्य यांनी नोव्हेंबर २००० ते मे २०११ पर्यंत बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या विचारसरणीतील परिवर्तनकारी नेते म्हणून भट्टाचार्य यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कारखानदारी सुरू केली. सिंगूर येथे टाटा नॅनो प्रकल्प उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्र उभारले. दरम्यान, २०११ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीने डाव्यांची सत्ता संपवली. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या पक्षाच्या पराभवानं बंगालमधील ३४ वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपुष्टात आली.