मुंबई- केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. करांची रचना काय होईल, येत्या वर्षामध्ये कोणत्या सुविधा, योजना मिळतील आणि कोणती उत्पादने स्वस्त होणार याची माहिती घेण्यासाठी नागरिक प्रयत्नशिल असतात. या अर्थसंकल्पाबाबत काही महत्त्वाच्या बाबी येथे जाणून घेऊ.
1) 2018-19 या वर्षासाठी सादर केले जाणारे बजेट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या या रालोआ सरकारचे शेवटचे 'पूर्ण' बजेट असेल. 2019 साली देशामध्ये मध्यावधी निवडणुका होत आहेत.
2) 2017 साली म्हणजे गेल्यावर्षी सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र करण्यात आला. 92 वर्षे हे दोन्ही अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते. मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्र केले.
3) डॉ. मनमोहन सिंह, यशवंत सिन्हा यांनी सलग पाच अर्थसंकल्प मांडले आहेत. 1 फेब्रुवारी 2018 साली बजेट मांडल्यावर अरुण जेटलीसुद्धा सलग पाच अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री होतील.
4) स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर. के. शण्मुखम चेट्टी यांनी मांडला. 26 नोव्हेंबर 1947 रोजी त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला.
5) मोरारजी देसाई हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री आहेत. त्यांनी 10 वेळेस अर्थसंकल्प मांडला आहे.
6) पी. चिदम्बरम यांनी 8 वेळा अर्थसंकल्प मांडून मोरारजी देसाई यांच्यानंतर दुसरा क्रमांक मिळवलेला आहे.
7) प्रणव मुखर्जी, यशवंत सिन्हा, यशवंतराव चव्हाण आणि सी.डी. देशमुख यांनी 7 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे.
8) टी. टी. कृष्णम्माचारी आणि डॉ. मनमोहन सिंह यांनी प्रत्येकी 6 वेळेस अर्थसंकल्प मांडलेला आहे.
9) प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदावरती कार्यरत असताना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आणि ते राष्ट्रपती झाले.
10) 1999 पर्यंत बजेट संध्याकाळी 5 वाजता सादर केले जाई. मात्र 1999 पासून ते सकाळी 11 वाजता सादर केले जाऊ लागले. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणारे यशवंत सिन्हा पहिले अर्थमंत्री ठरले. साधारणतः अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सादर केले जाई. मात्र गेल्या वर्षीपासून ते 1 फेब्रुवारीला सादर करण्याचे निश्चित झाले आहे. वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी हे बदल केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.