- डॉ. दिलीप साठे(कोषाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद)ज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे केवळ विज्ञान संशोधन नसून विज्ञान शिक्षण, संशोधन, शेती, आरोग्य, पाणी, पर्यावरण संरक्षण असे सर्व विषय त्यात येतात. त्या दृष्टीने याचा विचार केला तर २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रांसाठी यंदाचा अर्थसंकल्प दिलासादायक असून प्रत्यक्ष अंमलबजावणीने देशाचा प्रगतीचा आलेख निश्चितच उंचावेल.शेतीच्या क्षेत्रात ई-मार्केटिंगची सोय सुरू करणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे कृषी कर्जासाठी ११ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट विक्रीची किंमत मिळणार असल्याने बळीराजाही सुखावला आहे. धवल क्रांतीच्या धर्तीवर हरित क्रांती सुरू करणार आणि सेंद्रिय शेतीला उत्तेजन देणार असल्याने कृषी क्षेत्रासाठी भविष्यातले चित्र आशादायी आहे.या देशातील चार कोटी गरीब लोकांना विजेची विनामूल्य जोडणी करून दिली जाईल, असे अर्थसंकल्पात नमूद आहे. यासाठी १६,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प आशादायी आहे. गेल्या वर्षात अँजिओप्लास्टीसाठी वापरण्यात येणाºया स्टेंटच्या किमतीतून होणारी रुग्णांची लूट लक्षात घेऊन यंदाच्या अर्थसंकल्पात हृदय शस्त्रक्रियेत वापरले जाणारे स्टेंट स्वस्त केले आहेत.
budget 2018 : विज्ञान-तंत्रज्ञानाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 5:21 AM