मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेत आलेल्या केंद्र सरकारने त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षापासून देशामध्ये स्टार्ट अप वाढीस लागावेत यासाठी विविध योजना आणि घोषणा केल्या आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये स्टार्ट-अप्सवर विविध पातळ्यांवर चर्चा ही होत आहे. या काळात स्टार्ट अप सुरु करणाऱ्या काही उद्योजकांनी आपली देशातील सध्याच्या उद्योगस्थितीबाबत आणि केंद्रीय अर्थसंकल्पाकडून त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.इन मराठी डॉट कॉम या स्टार्टअपचे संस्थापक ओंकार दाभाडकर यांनी आपल्याकडच्या स्टार्ट-अप बाबत बोलताना सांगितले, "आपल्याकडे "ऑफ दि फ्यु फॉर दि फ्यु बाय दि फ्यु" अश्या स्वरूपाची स्टार्ट अप संस्कृती रुजली आहे. जर तुमचे "योग्य" लोकांशी चांगले कॉन्टॅक्टस असतील तरच तुम्हाला स्टार्ट अप इको सिस्टिमकडून मदत मिळते. त्यामुळे ज्या मोजक्याच स्टार्ट अप फाउंडर्सच्या त्या खास वर्तुळात ओळखी आहेत त्यांची स्थिती उत्तम आहे. इथे मुंबई-पुणे बाहेर लहानाची मोठी झालेली मुलं आपोआप मागे पडतात. स्टार्ट अप ची संकल्पना, बिझनेस मॉडेल चूक/वाईट आहे म्हणून मागे नं पडता, केवळ योग्य संपर्क नाहीत म्हणून समोर असंख्य अडचणी उभ्या राहातात."
तसेच दाभाडकर यांनी स्टार्ट अपसाठी पोषक वातावरण आपल्याकडे आहे का याबाबत मत व्यक्त करताना सांगितले, "स्टार्ट अप ही व्यवसायाची "ग्रोथ स्टेज" असते. त्यातून "एस्टॅब्लिश्ड बिझनेस" तयार होण्यासाठी आवश्यक ते वातावरण किमान महाराष्ट्रात तरी अजिबातच नाही. तुमची कल्पना किती चांगली आहे, तुमची टीम किती स्ट्रॉंग आहे, तुमची बिझनेस अंडरस्टॅण्डिंग किती चांगली आहे - अश्या काही महत्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांवरून पुढील मदत मिळायला हवी. तसं होत नाहीये. बहुतेकांना काही प्रश्नांची उत्तरं सापडलेली असतात, काहींसाठी त्यांची धडपड सुरु असते. त्यावेळी मदत मिळणं आवश्यक असतं. ते झालं नाही की स्टार्ट अप बंद पडतात. सध्या हेच होतंय."तीन वर्षांसाठी बिनव्याजी किंवा कमी व्याजदराने कर्ज मिळावेसध्या टँजिबल अॅसेट असणाऱ्या व्यवसायांसाठी योजना तयार होत आहेत. परंतु ९०% स्टार्ट अप्स सर्विस इंडस्ट्रीत असतात. त्यांना फारसा आधार मिळत नाही. माझ्याच मीडिया स्टार्ट अप ने सध्या ब्रेक-इव्हन फेज साध्य केला आहे. म्हणजेच माझ्या व्यवसायाचं, बिझनेस मॉडेलचं "व्हॅलिडेशन" यशस्वी झालं आहे. पण ह्यातून यशस्वी आणि उत्तम नफा देणारा व्यवसाय उभा करायचा असेल तर मला फंड्स लागणार! परंतु सध्याच्या स्टार्ट अप योजनांमध्ये मला गृहीत धरलं जात नाही - कारण मी टँजिबल अॅसेट्स उभे केलेले नाहीत. हा फार मोठा कच्चा दुवा आहे. येत्या बजेटमध्ये अशा स्टार्ट अप्ससाठी वेगळी योजना असायला हवी.