नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'गरीब व वंचित जनतेला समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना देखील ६ हजार रुपये प्रतिवर्षाला देण्याची घोषणा केल्याने एक मोठे पाठबळ मिळाले आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून गरीब, वंचित, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय सर्वांनाच दिलासा देणारा ठरला आहे. देशातील मध्यमवर्ग विविध समस्यांचा सामना करत असतो. आयकराचा ‘स्लॅब’ वाढविल्यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे' असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
'उच्चमध्यमवर्गीय नागरिकांचेदेखील समाधान झाले आहे' 40 ते 50 कोटी लोकांना तर थेट फायदा होणार आहे. माझ्या खात्यालादेखील भरीव योगदान दिले आहे. देशातील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम हे जगातील क्रमांक एकचे झाले आहे. नव्या भारताकडे आपण जात आहोत. सुखी, समृद्ध, अत्याधुनिक भारताकडे वेगाने प्रवास सुरू झाला आहे. नवीन भारताचा संकल्प या अर्थसंकल्पाद्वारे मांडण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मांडलेल्या या अर्थसंकल्पाचे जनता समर्थन करेल. केवळ निवडणूकीच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे पाहणे योग्य ठरणार नसल्याचं गडकरींनी म्हटलं आहे.
- असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार
- 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
- पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत
- किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी
- सरकार कामधेनू योजना सुरू करणार
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार
- दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार
- गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
- यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
- आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
- एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं