नवी दिल्ली - अर्थमंत्री पियुष गोयल यांनी यंदाचा 2019-20 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. तर, शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये देण्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींच्या अर्थसंकल्पावर टीका केली असून शेतकऱ्यांना दिवसाला 17 रुपये देणं हे सरकारचा अपमान असल्याचं राहुल यांनी म्हटलंय.
मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्पात लोकसभेत सादर केला. यंदाचा अर्थसकल्प मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे. तर, 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन मोदी सरकारने सर्वसामान्य नोकरादारांनाही आनंदाचा धक्का दिलाय. तसेच शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू ठेऊन हा अर्थसंकल्प मांडला. सरकारने या अर्थसंकल्पातून लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सादर केला.
शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले आहे. मात्र, राहुल गांधींनी मोदी सरकारची ही योजना शेतकऱ्यांचा अपमान करणारी असल्याचं राहुल यांनी म्हटलंय. मोदी सरकारने गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना दररोज 17 रुपये देणं हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याचंही राहुल यांनी म्हटलंय.