नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. 2014 प्रमाणेच या निवडणुकीतही सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी सोशल मीडियासाठी वेगळी रणनिती आखली. गेल्या निवडणुकीत भाजपानं मोठ्या खुबीनं सोशल मीडियाचा वापर केला होता. मात्र आता काँग्रेसनंही सोशल मीडियावर जोरदार मुसंडी मारली. मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी हे दिसून आलं. 1 फेब्रुवारीला काँग्रेस अध्यक्ष राहुल अध्यक्ष ट्विटरवर बाजी मारली. विशेष म्हणजे राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, पंतप्रधान कार्यालय यांनाही मागे टाकलं.1 फेब्रुवारीला अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी राहुल गांधींनी केलेलं ट्विट पहिल्या क्रमांकावर होतं. मोदी सरकारनं शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची मदत देणारी योजना सुरू करण्याची घोषणा केली. यावर राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सडकून टीका केली. राहुल यांचं ट्विट जवळपास 13 हजार जणांनी रिट्विट केलं. या बाबतीत नरेंद्र मोदींचं ट्विट चौथ्या, तर पीएमओचं ट्विट पाचव्या क्रमांकावर होतं. विशेष म्हणजे ट्विटरवरील मोदींच्या फॉलोअर्सची संख्या राहुल यांच्या फॉलोअर्सच्या तुलनेत पाचपट आहे. राहुल गांधींच्या या ट्विटला भाजपानं प्रत्युत्तर दिलं. मात्र त्या ट्विटला 9 हजार रिट्विट मिळू शकले. त्यामुळे हे ट्विट 1 फेब्रुवारीला दुसऱ्या क्रमांकावर होतं. तर तिसऱ्या स्थानावर एका पत्रकाराचं ट्विट होतं. त्यात मोदी आणि राहुल यांच्या मास्टरस्ट्रोकबद्दल भाष्य करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदींच्या ट्विटला 7500 रिट्विट मिळाल्यानं ते चौथ्या स्थानी होतं. तर पीएमओचं ट्विट 4700 वेळा रिट्विट झालं. गेल्या वर्षभरात राहुल गांधी सोशल मीडियावर अतिशय आक्रमक झाले आहेत. त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन राहुल यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे.