नवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यासाठी असलेल्या एसपीजी सुरक्षेसाठी 600 रुपये देण्यात आले आहेत. गेल्या बजेटमध्ये 540 कोटी रुपये देण्यात आले होते. गेल्या वर्षीही ही रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली होती. वर्षभरात या रक्कमेमध्ये जवळपास 180 कोटींची वाढ करण्यात आली आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली होती. यावर गांधी कुटुंबीय वारंवार सुरक्षेचे प्रोटोकॉल तोडत असल्याचे कारण देण्यात आले होते. यानंतर काँग्रेसकडून कडाडून विरोध झाला होता. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही सुरक्षा काढून घेतल्याने राज्यात टीकेची झोड उठली होती.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचीही एसपीजी सुरक्षा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काढून घेण्यात आली होती. माजी पंतप्रधान देवेगौडा, व्हीपी सिंह यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. एसपीजीची स्थापना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एक वर्षाने (1985) करण्यात आली होती. या एसपीजीला पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी दिलेली आहे.
1991 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी सुरक्षा पूर्ण गांधी कुटुंबीयांना देण्यात आली. 1999 मध्ये वाजपेयी सरकारने सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांची सुरक्षा मागे घेण्यात आली. यानंतर पुन्हा 2003 मध्ये सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यावेळी 10 वर्षाचा अवधी १ वर्ष करण्यात आला. तसेच दरवर्षी सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.