नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र या बजेटमधूनदिल्लीला विशेष असे काही मिळाले नसून, केंद्र सरकारकडून पुन्हा दिल्लीला डावलण्यात आले असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, आजच्या अर्थसंकल्पाकडे दिल्लीच्या जनतेची खूप अपेक्षा लागली होती. मात्र सरकारने त्यांची अपेक्षाभंग केली आहे. भाजपच्या दृष्टीने दिल्लीला काहीही महत्व नाही. त्यामुळे दिल्लीच्या मतदारांनी भाजपला का मतदान करावे ? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला.
तर दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपने दिल्लीच्या जनतेच्या पदरी निराशा दिली असल्याने, निवडणुकीनंतर ते दिलेले वचन पूर्ण करतील यावर कसा विश्वास ठेवावा असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.