Budget 2020 : 'साल भर का गम जनता को इनाम दिया है' अर्थसंकल्पाची काँग्रेसकडून खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 03:24 PM2020-02-01T15:24:05+5:302020-02-01T15:24:35+5:30
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे.
नवी दिल्ली - वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. आर्थिक मंदी आणि बाजारातील सुस्तीचा सामना करत असताना निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ''साल भर का गम जनता को इनाम दिया है' सरकारला टोला लगावला आहे. '
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विट करत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. "दुश्मन न करे दोस्त ने जो काम किया है, साल भर का गम गरीबों पर जुल्मो सितम फिर से जनता को ईनाम दिया है'' असा टोला सिंघवी यांनी लगावला आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनीही निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. अर्थसंकल्पाचे गणित समजावण्यात निर्मला सीतारामन यांना अपयश आले आहे. 4.8 टक्के जीडीपी वाढीसह 2024 पर्यंत 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य गाठणे हे एक स्वप्नच आहे, असा टोला शर्मा यांनी लगवला आहे.
दुश्मन न करे दोस्त ने जो काम किया है
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) February 1, 2020
साल भर का गम
गरीबों पर जुल्मो सितम
फिर से
जनता को ईनाम दिया है | #Budget2020#BudgetSession2020#NirmalaSitharaman
दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली होती. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील हे सरकार केवळ बोलण्याचे काम करते. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात कुठलीही भक्कम तरतूद करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मितीबाबत काहीही उल्लेख नाही. कुठलीही मध्यवर्ती कल्पना नसलेला दिशाहीन अर्थसंकल्प आहे.
''निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. वित्तमंत्र्यांनी केलेले भाषण मोठे होते. मात्र त्यात सांगण्यासारखे काहीच नव्हते. हा अर्थसंकल्प पोकळ ठरला,'' असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.