नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. या बजेटमधून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तर देशाला मंदीसदृश्य परिस्थितीतून बाहेर काढण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. मोदी सरकारसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर असताना एक सकारात्मक बातमी आली आहे. जानेवारीत सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून १.१० लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जुलै २०१७ मध्ये देशात जीएसटी लागू झाला. तेव्हापासूनचं उत्पन्न पाहता गेल्या महिन्यात (जानेवारी २०२०) सरकारला मिळालेलं उत्पन्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याआधी एप्रिल २०१९ मध्ये सरकारला जीएसटीमधून १.१३ लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. विशेष म्हणजे देशात मंदीसदृश्य परिस्थिती असताना, विकासदरात सातत्यानं घसरण आणि महागाईत वाढ होताना सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटीमधून मिळणारं उत्पन्न १ लाख कोटींपेक्षा अधिक राहिलं आहे. डिसेंबरमध्ये सरकारला जीएसटीमधून १ लाख ३ हजार १८४ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. तर त्याआधी नोव्हेंबरमध्ये जीएसटीमधून सरकारला १ लाख ३ हजार ४९२ कोटी रुपये मिळाले होते. येत्या महिन्यांमध्येदेखील जीएसटीमधून मिळणारं उत्पन्न वाढेल, अशी सरकारला आशा आहे. ही बाब लक्षात घेऊन कर विभागानं जीएसटीमधून होणाऱ्या संकलनासाठी उद्दिष्ट निश्चित केलं आहे. फेब्रुवारीत जीएसटीच्या माध्यमातून १.१५ लाख कोटी, तर मार्चमध्ये १.२५ लाख कोटींचं उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा सरकारला आहे. जीएसटी लागू झाल्यावर दर महिन्याकाठी सरकारला १ लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळेल, असा सरकारचा अंदाज होता. मात्र पहिल्या दोन वर्षांमध्ये तो अनेकदा चुकला. त्याचा परिणाम विकास दरावर आणि इतर गोष्टींवर झाला. याचीच परिणिती आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होण्यात झाली.
Budget 2020: अर्थसंकल्प सादर होत असताना मोदी सरकारसाठी मोठी खूशखबर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 11:36 AM