नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेती, उद्योग आणि शिक्षणामध्ये भरीव तरतूद करण्याची घोषणा केली. तसेच यासाठी देशातील दळणवळण सुधारण्यासाठी तब्बल 6000 किमींचे हायवे, 9000 किमींचे इकॉनमिक कॉरिडोर आणि 2000 किलोमीटरचे स्ट्रॅटेजिक हायवे बांधण्यात येणार आहेत.
देशात रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहेत. बांधकाम, सेवा आणि नव्या योजनांमुळे मोठ्य़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. देशभरात 5 स्मार्ट सिटी नव्याने उभारण्यात येणार आहेत. तसेच देशातील दळणवळण वाढविण्यासाठी 2500 किलोमीटर एक्सप्रेस हाईवे बनविण्य़ात येणार आहेत. यावेळी सीतारामन यांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे, चेन्नई-बेंगलुरू एक्सप्रेस हायवेची घोषणा केली. तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याचे सांगितले.
550 रेल्वे स्थानकांवर वाय फाय सुविधा देण्यात येणार आहे. 27 हजार किमीच ट्रॅकचे विद्युतीकरण केले जाणार आहे. सोलार पावर ग्रीड रेल्वे रुळांच्या बाजुलाच तयार करण्यात येणार आहे. तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढविण्यात येणार आहे. बेंगळुरूमध्ये मुंबई लोकलप्रमाणे उपनगरीय ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार यासाठी 25 टक्के निधी देणार आहे. यासाठी 18600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
देशभरातील गॅस वाहतुकीसाठी ग्रीड 16200 किमीवरून 27 हजार किमी वाढविण्यात येणार आहे. तसेच विद्युत मीटर प्रीपेड करण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटरद्वारे सप्लायर आणि दर निवडण्याचा पर्याय असणार आहे. विद्युत विभागासाठी 22 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत.