नवी दिल्ली: मोदी सरकार-२ चा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सादर केला. टॅक्स स्लॅबमध्ये बदल, एलआयसी, आयडीबीआय यांच्यातला हिस्सा विकण्याच्या घोषणा यांचा अर्थसंकल्पात समावेश आहे. एकीकडे भाजपाकडून या अर्थसंकल्पाचं कौतुक होत असताना दुसरीकडे विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका होऊ लागली आहे. आमदार जिग्नेश मेवाणी यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. 'सरकार देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गाची जबाबदारी पूर्णपणे झटकू पाहतंय. यांना जराही शरम वाटत नाही,' अशा शब्दांत मेवाणी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर बरसले. यावेळी त्यांनी खासगीकरणाच्या मुद्द्यावरुनही सरकारवर जोरदार टीका केली. 'रेल्वे, एअर इंडिया, एलआयसीचं खासगीकरण झालं आहे. खासगीकरणासह कर कपात आणि इतर सवलती देऊन सरकार केवळ अदानी, अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींसाठी काम करत आहे,' अशी टीका त्यांनी केली. मोदी सरकार केवळ उद्योगपतींच्या संपत्ती निर्मितीत रस असून सामान्यांशी त्यांना देणंघेणं नाही, असं टीकास्त्र मेवाणी यांनी सोडलं. 'शेतकऱ्यांचे मृत्यू, बेरोजगारी असे प्रश्न आ वासून उभे असताना मोदी सरकार खासगी कंपन्यांच्या हाती अधिकाधिक नियंत्रण देऊ पाहात आहे. कोट्यधीश आणखी श्रीमंत कसे होतील, याची सरकारला चिंता आहे. सार्वजनिक उपक्रमांवरील खर्चाला मात्र सरकारकडून कात्री लावण्यात येत आहे,' अशा शब्दांत मेवाणी यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर तोंडसुख घेतलं.