नव दिल्ली - 2021 या वर्षांचा देशाचा अर्थसंकल्प Union Budget 2021 for Health Care सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. सुरुवातीलाच लॉकडाऊन आणि कोरोना संदर्भात माहिती देताना केंद्र सरकारने दिलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच, देशातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असून जगातील सर्वात कमी रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे देशाच्या आरोग्य क्षेत्राची जाणीव आपल्याला करुन दिली. त्यामुळेच, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला भरभरुन देण्यात आलं आहे. आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 137 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी देण्यात आले असून गरज भासल्यास आणखी निधी देण्यात येईल, असे निर्मला सितारमण यांनी सांगितलं. यंदा आरोग्य खात्यासाठी तब्बल 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या वर्षीचा आरोग्य खात्याचा अर्थसंकल्प हा 92 हजार कोटी रुपयांचा होता. म्हणजेच, यंदाच्या बजेटमध्ये तब्बल 137 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
देशभरात 17 नवीन आरोग्य केंद्र सुरु करण्यात येणार आहेत, तसेच देशातील 32 विमानतळांवरही आरोग्य केंद्रांची उभारणी होणार आहे. देशात नॅशनल इस्टीट्यूट ऑफ वर्ल्ड हेल्थही सुरु करण्यात येईल. त्यासोबतच, 4 नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी उभारण्यात येणार असून 9 बायो लॅबही सुरू करण्यात येतील. प्रिव्हेंटीव्ह, क्युरेटीव्ह आणि वेल बिईंग पीएम आत्मनिर्भर स्वास्थ योजनेचीही सुरुवात करण्यात येणार आहे, त्यासाठी 62 हजार कोटींची तरतूद केली असून पुढील 6 वर्षात ते खर्च करण्यात येतील, अशी माहिती निर्मला सितारमण यांनी दिली.
पंतप्रधान गरीब कल्याण योजना दिली
कोरोना कालावधीतील तीन आठवड्याच्या लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात करण्यात आली असून याचा फायदा देशातील ८० कोटी लोकांना झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी दिली. देशातील आठ कोटी लोकांना मोफत गॅस सिलिंडर मिळालं. या कालावधीत मोठ्या संख्येत लोकं आपापल्या घरात होती. असं असलं तर आरोग्य सेवक, बँक कर्मचारी, वीज कर्मचारी, आपले अन्नदाते आणि जवान कार्यरत होते," असं सीतारामन म्हणाल्या.
आत्मनिर्भर पॅकेज दिलं.
"या कालावधीत सदनातील सर्व सदस्यांनी ज्याप्रकारे साथ दिली त्यांचे मी आभार मानते. विधानसभा सदस्य आणि लोकसभेचे सदस्य यांनी आपलं वेतनही या महासाथीदरम्यान दिलं. या कालावधीत सरकारनं आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केलं. यावेळी सरकारनं एकूण २७.१ लाख कोटी रूपये दिली जे देशाच्या जीडीपीच्या १३ टक्के आहेत," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या वेळी जेव्हा आम्ही अर्थसंकल्प सादर केला तेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कोणत्या दिशेला जाणार हे आम्हाला माहित नव्हतं. कोणालाच ही कल्पनादेखील नव्हती की आपण एका मोठ्या महासाथीच्या दिशेने जात आहोत, असंही सीतारामन यांनी नमूद केलं