नवी दिल्ली: विखे पाटील आणि पवार कुटुंबातील असलेला संघर्ष लोकसभेतही पाहायला मिळाला. साखर कारखान्यांच्या प्रश्नावरून बोलताना यूपीए सरकारवर टीका करणाऱ्या भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे पवार आणि विखे पाटील कुटुंबातील संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्याचं दिसलं.
सहकाराबद्दल बोलताना सुजय विखे पाटील यांनी यूपीए सरकारच्या कामावर जोरदार टीका केली. या टीकेला सुळेंनी प्रत्युत्तर दिलं. यूपीए सरकारच्या काळात हे स्वतः काँग्रेसमध्ये होते. ते स्वतः यूपीए सरकारच्या योजनांचे लाभार्थी होते. खाल्ल्या मिठाला जागावं, अशी शिकवण मला माझ्या आईनं दिली आहे. यूपीए सरकारमध्ये असताना सुजय विखे यांचे वडील मंत्री होते. त्यावेळी ते गांधी कुटुंबाला भेटायचे. त्यावेळी जी धोरणं आखली गेली, त्यात त्यांचा सहभाग होता. त्यामुळे खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे. मला माझी संस्कृती हेच सांगते, अशा शब्दांत सुळेंनी विखेंचा समाचार घेतला.
काय म्हणाले सुजय विखे पाटील?सुप्रिया सुळे जेव्हा बोलत होत्या, त्यांनी ज्यावेळी प्रत्युत्तर दिलं, त्यावेळी दुर्दैवाने मी लोकसभेत नव्हतो. वेळ येईल तेव्हा मी संसदेत उत्तर देईन. महाविकास आघाडी सरकारचे खासदार केंद्राच्या योजनांचे कार्यक्रम घेतात, तेव्हा मोदींचे फोटो का लावत नाहीत? ज्या केंद्राच्या योजनांचा फायदा घेता, त्यांचा किमान उल्लेख तरी करा. साखर उद्योगाबाबत यूपीए आणि मोदी सरकारच्या निर्णयांची समोरासमोर बसून चर्चा करा. साखर उद्योगाला केवळ मोदी सरकारच्या निर्णयामुळे स्थैर्य प्राप्त झालं आहे. मोदींमुळेच साखर कारखाने टिकले, अशा शब्दांत सुजय यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं.